अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील रुख्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालय अमळनेर येथे इतिहास विषयाच्या प्राध्यापिका प्रा जयश्री साळुंके दाभाडे यांनी त्यांचे पती राजेंद्र (आबाजी) साळुंके यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त स्वलिखीत पुस्तक प्रकाशित करून एक आगळी वेगळी आदरांजली वाहिली.सदर पुस्तक प्रकाशन प्रा साळुंके यांनी आपल्या वर्गातील TYBA च्या विद्यार्थिनींच्या हस्ते केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस जे शेख, डॉ अमोल दंडवते, डॉ हुकुमचंद जाधव उपस्थित होते. प्रा साळुंके यांनी आपल्या मनोगतात माझे पती राजेंद्र यांना वाचण्याची आवड होती. आर्थिक परिस्थिती नसल्या मुळे सार्वजनिक वाचनालयात जाऊन वर्तमान पत्र आणि पुस्तके वाचत असत. शिक्षणाची त्यांना नितांत आवड होती. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेवून रेल्वेच्या परीक्षा दिल्या आणि पच्छिम रेल्वेत मुंबई येथे नोकरीला लागले.
पुस्तक प्रकाशित करताना माझ्या सदैव त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रत्येक कार्यात त्यांनी अप्रत्यक्ष पाठींबा असे. आज हे पुस्तक आपल्या सर्वांच्या हाती देताना आपल्या सर्वांना देखील त्यांचे आशीर्वाद व जीवन वाटचाल सदैव आठवणीत राहील. उपस्थित विद्यार्थिनी मधून राजश्री पाटील हिने उत्स्फूर्त पणे आपले मत व्यक्त केले.तीने दाभाडे मॅडम ह्या आमच्या अत्यंत जवळ असून त्यांचा प्रत्येक उपक्रम, लेक्चर, जीवन प्रवास प्रेरणा देणारा असतो. आम्ही सर्व मुली त्यांना फॉलो करतो. त्यांच्या सारखं स्ट्राँग बनण्याचा प्रयत्न करतो. असे मत व्यक्त केले.
यावेळी डॉ हुकुमचंद जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना प्रा साळुंके मॅडम ह्या नेहमी आगळे वेगळे उपक्रम राबवित असतात.आजही त्यांच्या पतीचे प्रथम पुण्य स्मरण निमित्त त्यांनी पुस्तक प्रकाशित करून अनोखी आदरांजली वाहिली आपणही देखील त्यांच्या अश्या विविध उपक्रमांचे स्वागत व अनुसरण केले पाहिजे असे मत व्यक्त केले. या छोट्याश्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ एस जे शेख हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ शेख यांनी कै. राजेंद्र यांच्या जीवनावर प्रकाश टाकून ह्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक व स्वागत करून आपल्या सर्वांना हा दिवस पुस्तक रूपाने कायम स्मरणात राहील असे मत व्यक्त केले. सदर पुण्यस्मरण हे तिथी नुसार होते.