जळगाव मिरर | १३ ऑक्टोबर २०२५
जळगाव शहरातील शिवाजीनगर स्मशानभूमीतून मृत महिलेच्या अस्थी आणि दागिन्यांची चोरी झाल्याची संतापजनक घटना आज (१३ ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, सलग दुसऱ्यांदा अशा प्रकारची घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार राजूमामा भोळे यांनी तातडीने स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केली. त्यांनी “हा प्रकार म्हणजे मृत व्यक्तीच्या नातेवाईकांच्या भावना दुखावणारा आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे द्योतक आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढे बोलताना त्यांनी मनपा आयुक्तांकडे याबाबत चौकशी व कारवाईची मागणी करणार असल्याचे सांगत, स्मशानभूमीत सुरक्षा रक्षक नेमणे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरातील खडके चाळ येथील रहिवाशी जिजाबाई पाटील यांचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्यसंस्कारानंतर आज (१३ ऑक्टोबर) सकाळी नातेवाईक अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमीत आले असता, मयत जिजाबाई पाटील यांची कवटी व पायाचा काही भाग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच त्यांच्या अंगावरील सुमारे ४ ग्रॅम सोन्याचे दागिनेही गायब झाल्याचे दिसून आले.तसेच त्यांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नैवैद्य असलेले ताटही आढळून आले. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, लीलाताई यांनी आयुष्यभर घातलेले काही दागिने त्यांच्यासोबतच ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, अस्थींसह दागिन्यांची चोरी झाल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला असून, “हा प्रकार अत्यंत अमानवी आणि असंवेदनशील आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.
नातेवाईकांनी प्रशासनाकडे तत्काळ तपास सुरू करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच, अशा ठिकाणी योग्य सुरक्षा यंत्रणा उभारून पुढील काळात असे प्रकार घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आवाहनही केले आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात मेहरून स्मशानभूमीत छबाबाई पाटील यांच्या अंत्यसंस्कारांनंतर त्यांच्या अंगावरील दोन तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस आले होते. नातेवाईक अस्थी घेण्यासाठी आले असता, स्मशानभूमी सुरक्षित नसल्याचे चित्र समोर आले. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच, चोरट्यांनी पुन्हा त्याच पद्धतीने दुसरी चोरी केली आहे.