
जळगाव : प्रतिनिधी
क्रांती चौकात असलेल्या आनंद मदनलाल नागला यांचे किराणा दुकान फोडणाऱ्या एका संशयित आरोपीस शहर पोलिसांनी अटक केली आहे. या संशयित आरोपीला गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील शिवाजी नगर परिसरातील क्रांती चौकात १ जुलै २०२२ रोजी रात्री ९. ४५ वा. नेहमीप्रमाणे नागला आपले दुकान बंद करुन वरच्या मजल्यावरील घरात गेले होते. दुस-या दिवशी सकाळी सात वाजता ते दुकानात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. शटर उचकावून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ८५ हजार रुपये रोख आणि ५ हजार रुपयांची चिल्लर असे एकुण ९० हजार रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी त्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती. शहर पोलिसांनी या घटनेची चौकशी करीत आज १६ ऑगस्ट रोजी जुबेर शेख भिकन उर्फ डबल याला गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे. गुन्हा घडल्यानंतर गेल्या दिड महिन्यापासून जुबेर शेख उर्फ डबल हा फरार होता.त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. भास्कर ठाकरे आणि पो.कॉ. तेजस मराठे या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला गेंदालाल मिल परिसरातून अटक केली आहे.





















