जळगाव मिरर । २ ऑक्टोबर २०२५
घराच्या बेडरुममधील ड्रॉवरमधून प्रणाली किरण बारी (वय २९, रा. दिक्षीतवाडी) ३ लाख ८० हजार रुपये किंमतीची ७ तोळे वजनाची सोन्याची मंगलपोत चोरुन नेली. ही घटना दि. २७रोजी रात्रीच्या सुमारास दिक्षीत वाडी परिसरात घडली. याप्रकरणी दि. ३० रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील दिक्षीतवाडी परिसरात प्रणाली बारी या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. त्यांच्याकडे लीला कोळी रा. कांचननगर या महिला घरकाम करतात. बारी यांच्या घरातील बेडरुममध्ये लाकडी कपाट असून त्यामध्ये ते दैनंदिन वापरातील वस्तू ठेवतात. दि. २५ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांना देवीच्या आरतीसाठी जायचे असल्याने विवाहितेने सासरच्यांकडून मिळालेली ७ तोळे सोन्याची पोत घातलेली होती. देवीची आरती करुन घरी परतल्यानंतर त्यांनी ती मंगलपोत कपाटातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली होती.
दि. २७ रोजी दुपारच्या सुमारास विवाहिता बेडरुमची साफसफाई करीत असतांना कपाटातील लाकडी ड्रॉवर खाली पडले. यावेळी त्यांना ड्रॉवरमध्ये ठेवलेली मंगलपोत दिसून आली नाही. त्यांनी संपुर्ण रुममध्ये शोधले तरी देखील मंगलपोत मिळून आली नाही. घटनेची माहिती विवाहितेने पतीला सांगितल्यानंतर ते देखील लागलीच घरी परतले. त्यांनी घरातील सर्वांना मंगलपोत बाबत विचारणा केली. मात्र कोणालाही काहीही माहिती नसल्याने त्यांना मंगलपोत चोरी झाल्याची खात्री झाली. त्यांनी दि. ३० रोजी पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.