जळगाव मिरर | १७ नोव्हेबर २०२३
जळगाव शहरातील एका माजी सैनिकाच्या घरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. याठिकाणाहून चोरट्यांनी १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील मंगलमुर्ती नगरात जगदीश काशिनाथ पाटील (वय ४३) हे माजी सैनिक आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दीपावलीच्या निमित्ताने दि. १३ नोव्हेंबर रोजी ते परिवारासह घराला कुलूप लावून गावाला गेले होते. दरम्यान चोरट्यांनी त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत घराचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. तसेच घरात ठेवलेले सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ३५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार मंगळवार १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता सुमारास उघडकीला आला. त्यांनी घरात जाऊन पाहणी केली असता घरात सर्व सामान अस्तव्यस्त पडलेला दिसून आला. त्यामुळे त्यांना आपल्या घरात चोरी झाल्याची खात्री झाली. बुधवारी जगदीश पाटील यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.