जळगाव मिरर / ७ एप्रिल २०२३ ।
ग्रामीण भागात सध्या यात्रा-जत्रा, वाढदिवस, विविध कार्यक्रमांचे उदघाटन यामध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याची मागणी वाढत आहे. लाखोंमध्ये पैसा खर्च करुन आयोजक गौतमी पाटीलच्या नृत्याचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. तरुणाईच नव्हे तर प्रत्येक वयो गटातील लोक गौतमीच्या नृत्यावर भान हरपून नाचताना दिसून येत आहेत. मात्र यामध्ये अनेक राडेसुद्धा पाहायला मिळत आहेत. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ या डायलॉगची सध्या चांगलीच हवा पाहायला मिळत आहे. विविध लावण्यांवर धमाकेदार नृत्य करत सर्वांनाच वेड लावणारी नृत्यांगना म्हणजे गौतमी पाटील होय.
ग्रामीण भागात सध्या गौतमी पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आहे. गावातील विविध कार्यक्रमांमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्याची झलक पाहायला मिळत आहे. पण ज्याठिकाणी प्रसिद्धी येथे तिथे वाद हा आपसूकच येतो. गौतमी कधी आपल्या नृत्यामुळे तर कधी आपल्या आक्षेपार्ह हावभावामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडते.
नुकतंच पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील अन्नापुर येथे गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला शिरुर पोलिसांनी परवानगी नाकारल्याने ऐन कार्यक्रम सुरू करण्याच्या वेळी कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की आयोजकांसह गौतमी पाटीलवर आली .गुरुवारी रात्री शिरुरच्या अन्नापुर येथे हनुमान जयंती निमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र पुणे ग्रामीण पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आयोजकांवरती गौतमी पाटीलचा कार्यक्रम ताबडतोब रद्द करण्याची वेळ आली. मोठी रक्कम घेऊन आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊनही गौतमी पाटीलला परफॉर्म करता आलं नाही.
या वेळी आयोजकांनी गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. हनुमान जयंतीच्या कार्यक्रमात कुठलाही गोंधळ होऊ नये यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याचं बोललं जात आहे. गौतमी पाटील आणि राडा हे समीकरणच बनलं आहे. तिच्यावर सतत टीका होत असते. नुकतंच कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी गौतमीवर टीका करत म्हटलं होतं की, “तिने तीन गाणी वाजवून तीन लाख घेतले, आणि आम्ही आमच्या कीर्तनासाठी पाच हजार जरी मागितले तरी लोक म्हणतात त्यांचं काय खरं आहे, पैशांचा बाजार मांडलाय नुसता..’ तिच्या कार्यक्रमात राडा-वाद होऊनही असं, आणि आम्ही टाळ वाजवूनही आम्हाला काहीच मिळत नाही”, असा टोला इंदुरीकर महाराज यांनी लगावला होता.