जळगाव मिरर | २६ जानेवारी २०२६
नाशिक जिल्ह्यातील श्री सप्तशृंगी देवीला संक्रांत सणानिमित्त रथसप्तमीच्या पावनदिनी डोहोळे परिवारातर्फे हलव्याचे भव्य अलंकार अर्पण करण्यात आले. देवीचरणी ही सेवा अर्पण करण्याचे यंदाचे डोहोळे परिवाराचे सहावे वर्ष आहे.
डोहोळे परिवारात हलव्याचे अलंकार घडविण्याची तीन पिढ्यांची परंपरा असून तिसऱ्या पिढीतील अनघा अजय डोहोळे यांनी साकारलेले हे अलंकार विशेष आकर्षण ठरले. त्यांच्या कलेची दखल घेत हलव्याचे अलंकार आता सातासमुद्रापार पोहोचले आहेत.
श्री सप्तशृंगी देवीच्या मूर्तीच्या भव्यतेनुसार अत्यंत कौशल्याने हे अलंकार तयार करण्यात येतात. सकाळच्या आरती व शृंगार प्रसंगी नेहमीच्या आभूषणांसोबत हे हलव्याचे अलंकार देवीस परिधान करण्यात आले. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. याप्रसंगी श्री सप्तशृंगी देवी ट्रस्टच्या वतीने अजय डोहोळे, अनघा डोहोळे, उषा डोहोळे, अनय डोहोळे व अथांग डोहोळे यांचा प्रसादरुपी सन्मान करण्यात आला.





















