
जळगाव मिरर | २७ सप्टेंबर २०२५
गेल्या दोन वर्षापासून जळगाव येथील श्री गुरुसिंह गुरुद्वारा येथे पुजारी म्हणून काम करणारे नितेशसिंग जगजितसिंग चौहान हे शुक्रवारी सकाळी नित्य पूजाअर्चा करून गावाकडे जायला निघाले. कौटुंबिक कार्यक्रम आटोपून संध्याकाळपर्यंत परत येतो, असे सांगून गेलेल्या चव्हाण यांच्या मृत्यूची वार्ताच जळगावात धडकल्याने गुरुद्वारातील सर्व पदाधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाट्याजवळ वाळूच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात नितेश जगतसिंग चौहान (३२), सुनीता नितेश चौहान (२५) आणि शिव नितेश चौहान (७ वर्ष, सर्व रा. मातापूर ता. डोईफोडा जि. ब-हाणपूर, मध्य प्रदेश) हे ठार झाले. तर नेहालसिंग नितेशसिंग चौहान (११) हा जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेशसिंग चौहान हे दोन वर्षांपासून जळगाव येथे गुरुद्वारामध्ये पुजारी म्हणून काम पाहत होते. मालापूर हे मूळ गाव असल्याने तेथे ते अधूनमधून जात. शुक्रवारी नातेवाइकांकडे कौटुंबिक कार्यक्रमासाठी जायचे म्हणून ते पत्नी व दोन मुलांसह दुचाकीवरून निघाले. पूर्णाड फाट्याजवळ पोहोचल्यानंतर वळण घेण्यासाठी ते थांबले असता मागून येणाऱ्या भरधाव डंपरने त्यांना धडक दिली. त्यात तिघांचा मृत्यू झाला, तर अकरा वर्षीय मुलगा जखमी झाला आहे.
अपघातात नेहाल सिंग बचावला असून, जळगाव येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुजारी नितेशसिंग यांनी त्यांच्या दोन्ही मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उच्चशिक्षित करण्याचा निर्धार केला होता. यासाठी गुरुद्वारा पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ देत मुलांना चांगल्या शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. चौहान यांची दोन्हीही मुले खासगी शाळेत शिक्षण घेत होते. यातील एक मुलगा नियतीने हिरावला, नेहाल सिंग हा आई-वडिलांच्या छत्रछायेला पोरका झाला आहे.




















