जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४
खोटे शपथपत्र देऊन जमिनीचे वाढीव क्षेत्र नावावर करून राजेश सोमा खडके (वय ६२, रा. विठ्ठलपेठ) यांची तीन जणांनी फसवणूक केली. याबाबत त्यांनी जाब विचारला असता, वृद्धाला मारहाण करण्यात आली. ही घटना दि.३० जून २०१५ ते दि. ४ डिसेंबर २०२३ दरम्यान घडली. या प्रकरणी दि. २६ नोव्हेंबर रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील विठ्ठपेठेत राहणारे राजेश खडके यांचे जळगाव शिवारातील गट क्रमांक ११४ ब मध्ये शेत आहे. धर्मा बोंद्रु खडके (वय ७२), भरत धर्मा खडके (वय ५५), विजय धर्मा खडके (वय ५०, तिघ रा. रामपेठ) यांनी संगनमत करून खोट्या नोंदी घेत राजेश खडके यांच्या नावावरील जमिनीतील दोन आर क्षेत्र हे ७/१२ उताराव्यावर नावे लावून घेतले. याविषयी खडके यांनी माहितीचा अधिकारामार्फत माहिती मागितली असता त्यांना माहिती मिळाली नाही.
तसेच त्या जागेवर तिघांनी अतिक्रमण करून बांधकाम करत असताना खडके यांनी हरकत घेतली. यातून धर्मा खडके, भरत खडके आणि विजय खडके या तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी त्यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि साजीद मन्सुरी करीत आहेत.