जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेतून पडून मृत्यू होण्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वेतून पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटना शनिवारी रावेर रेल्वे स्थानकानजीक घडल्या. मृतांमध्ये, रावेर येथील बँड व्यावसायिक आणि खंडवा येथील दोन ढोलवादक तरुणांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरातील रेणुका बँडचे संचालक व तहसील कार्यालयातील निवृत्त कर्मचारी रतन राजाराम भालेराव (वय ६३) हे रेल्वेने रावेरहून भुसावळकडे जात होते. रेल्वेतून खाली पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रावेर प्लॅटफॉर्मपासून काहीच अंतरावर शनिवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली. पुतण्या मनोज मनोहर भालेराव (रा. अहिरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत खंडवा येथील ‘मोहब्बते’ ढोल-ताशा ग्रुपमधील सात- वादक येथे आठ भुसावळ वाद्य लग्नसमारंभात वाजवण्यासाठी पुष्पक एक्स्प्रेसने जात होते. अजंदे गावालगतच्या रेल्वे बोगद्याजवळ यापैकी आकाश किशोर बेद व मोनू बल्ला मुंडेले हे दोघेजण तोल जाऊन खाली पडले. रेल्वे प्रवाशांनी चेन ओढून गाडी थांबवली. त्यात आकाश बेद याचा जागीच मृत्यू झाला, तर मोनू मुंडेले हा गंभीर जखमी झाल्याने त्याला त्याच रेल्वेतून भुसावळ येथे नेले जात असताना वाटेतच त्याचाही मत्य झाला.