जळगाव मिरर / १७ मार्च २०२३
जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी जळगाव पोलीस नेहमीच कारवाई करताना दिसून येत असतात. आज शहरातील गेंदालाल मिल परिसरातील तीन अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला जळगाव पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. या कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. किरण अनिल बाविस्कर (२४), आकाश सुरेश बर्वे (२३) व महेश उर्फ मन्या संतोष लिंगायत (२१, गेंदालाल मिल, जळगाव) अशी हद्दपार करण्यात आलेल्या टोळी सदस्यांची नावे आहेत.
शहरातील गेंदालाल मिल भागातील कुविख्यात टोळीविरोधात जळगाव शहर पोलिसात तब्बल नऊ गुन्हे दाखल आहेत. दाखल गुन्ह्यांमध्ये चोरी, घरफोडी, जबरी लूट, दरोडा आदी प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. आरोपींविरोधात कारवाई केल्यानंतर ते जामिनावर सुटल्यानंतर पुन्हा गुन्हे करीत असल्याने त्यांना हद्दपार करण्याबाबत जळगाव शहर पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यावर पोलीस उपअधीक्षकांनी पडताळणी केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होत. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी तीन सदस्य असलेल्या गुन्हेगारी टोळीला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे.