
जळगाव मिरर | ३ जुलै २०२४
देशातील उत्तर प्रदेश येथील हाथरस जिल्ह्यात आयोजित नारायण साकार विश्व हरी ऊर्फ भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रमात मंगळवारी चेंगराचेंगरी झाली. अन् अक्षरशः मृत्यूचे तांडव घडले. या दुर्दैवी घटनेत ११६ हून अधिक भाविक मृत्युमुखी पडल्याची पुष्टी अलिगडच्या आयुक्तांनी केली. मृतांमध्ये बालके व महिलांचा समावेश आहे. या घटनेत २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी व रुग्णालयाबाहेर मृतदेहांचा अक्षरशः खच पडल्याचे पहायला मिळाले. घटनास्थळावरील हृदयद्रावक दृश्ये पाहून एका पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या घटनेवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख, तर जखमींना प्रत्येकी ५० हजारांची मदत जाहीर केली.
सविस्तर वृत्त असे कि, यूपीच्या हाथरस जिल्ह्यापासून ४७ किमी दूरस्थित फुलरई गावात मानव मंगल मिलन समागम समितीने नारायण साकार विश्व हरी नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबा यांचे सत्संग (प्रवचन) ठेवले. या वेळी भाविक मोठ्या संख्येने गावात दाखल झाले. कार्यक्रमास्थळी प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा कैक पट अधिक सुमारे ५० हजार भाविक जमले. सत्संग संपल्यानंतर भाविक परत जात असतानाच अचानक चेंगराचेंगरीचा प्रकार घडला. या वेळी एकमेकांना पायदळी तुडवत लोक पुढे गेले.
त्यामुळे घटनास्थळी एकच खळबळ माजली- दुर्दैवाने महिला व बालकांसह अनेकांना प्राण गमावला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. चेंगराचेंगरीत जखमी व बेशुद्ध झालेले तथा मृत्युमुखी पडलेल्यांना ट्रक, ट्रॅक्टर व बस यासह मिळेल त्या वाहनाने तातडीने एटा जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. काहींना जवळच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. पण, रस्त्यातच अनेक जखमींची प्राणज्योत मालवली. त्यामुळे रुग्णालयासमोर अक्षरशः मृतदेहांचा सडा पडल्याचे विदारक दृश्ये पहायला मिळाले. अनेक जखमींची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्यामुळे या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हाथरसमधील चेंगराचेंगरीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी यांच्यासह अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केले.






















