जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२५
राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात प्रेम प्रकरणामुळे गुन्हेगारीच्या घटना घडत असताना आता मुंबई येथील लालबाग-काळाचौक परिसरात शुक्रवारी सकाळी एक अत्यंत थरारक घटना घडली. ब्रेकअप झाल्याने मानसिक तणावात असलेल्या एका 24 वर्षीय तरुणाने त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडवर दिवसाढवळ्या रस्त्यावरच चाकूने हल्ला केला. तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्यानंतर या तरुणाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, आंबेवाडी येथे राहणाऱ्या सोनू बराय (24) याचे याच परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या 8-10 दिवसांपासून दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते. तरुणीचे अन्य कोणासोबत संबंध असल्याच्या संशयावरून दोघांचे ब्रेकअप झाले होते. ब्रेकअपनंतर सोनू प्रचंड तणावात होता. तरुणीसोबत पुन्हा समेट घडवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. त्यानुसार आज सकाळी सोनूने पीडित तरुणीला भेटायला बोलावले. सुरुवातीला दोघांमध्ये प्रचंड वाद झाले व त्यानंतर सोनूने तरुणीला बेदम मारहाण करण्यास सुरू केले. बचाव करण्यासाठी तरुणीने पळ काढत जवळच असलेल्या आस्था नर्सिंग होममध्ये शिरली. तरुणाने पाठलाग करत तिथे जाऊन चाकूहल्ला सुरू केला.
यावेळी नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांनी तसेच तिथे उपस्थित स्थानिक लोकांनी सोनूला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोनूने स्वतःच्या गळ्यावर चाकू फिरवला. यावेळी तिथे उपस्थित वाहतूक पोलिसाने पीडित तरुणीला बाहेर ओढत सोनूच्या तावडीतून सुटका केली. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या दोघांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोनूचा मृत्यू झाला. तर तरुणी आयसीयूमध्ये असून प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच काळाचौकी पोलिस आणि पोलिस उपायुक्त आर. रागसुधा यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्या नर्सिंग होममध्ये हा प्रकार घडला, तिथे मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पडला होता. या घटनेने काळाचौकी परिसरात तणावाचे वातावरण असून, पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.




















