जळगाव मिरर | ९ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली असून दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील रावेर-यावल मतदार संघात सध्या भाजपची नाव डुबतांना दिसून येत आहे. भाजपकडून गेल्या अनेक वर्षांपासून तयारी करीत असलेल्या सर्वांना डावलून अमोल जावळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अमोल जावळे यांचा मतदारसंघात फारसा जनसंपर्क नसल्याने त्यांची मदार सर्वस्वी वरिष्ठ नेत्यांवर दिसून येत आहे. अमोल जावळेंच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या सभा आणि रॅली होणार आहेत. नाराज उमेदवार लक्ष देत नसल्याने मोठ्या नेत्यांना मैदानात उतरवले जात असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
रावेर-यावल मतदार संघात यंदा पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी प्रामुख्याने तिरंगी लढत रंगणार आहे. रावेरमधून विद्यमान आमदार शिरीष चौधरी यांचा मुलगा धनंजय चौधरी काँग्रेसकडून तर भाजपकडून माजी खा.हरिभाऊ चौधरी यांचा मुलगा अमोल जावळे मैदानात उतरले आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यंदा प्रहार जनशक्ती पक्षाकडून आणि वंचित बहुजन आघाडीकडून शमीभा पाटील आणि रावेरचे माजी नगराध्यक्ष दारा मोहम्मद हे अपक्ष मैदानात उतरले आहे. पंचरंगी दिसत असलेली निवडणूक धनंजय चौधरी, अनिल चौधरी आणि अमोल जावळे यांच्यातच रंगणार आहे.
भाजपच्या नाराजांची नाराजी भोवणार
रावेर-यावल मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून डॉ.कुंदन फेगडे, पांडुरंग सराफ, डॉ.केतकी पाटील हे पूर्ण ताकदीने तयारीला लागले होते. त्यातच डॉ. फेगडे आणि सराफ यांचा प्रचार जोरात सुरु होता. सर्व प्रक्रियेत अमोल जावळे हे कुठेही नव्हते किंवा त्यांनी जनसंपर्क देखील वाढवला नव्हता मात्र वडिलांच्या पुण्याईने त्यांना पक्षाने उमेदवारी दिली. बहुतांश काळ मुंबईत असलेले अमोल जावळे यांना उमेदवारी दिल्याने तयारीत असलेले सर्व नाराज झाले. भाजपातील नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न जेष्ठ नेत्यांनी केले आहे मात्र नाराजी मतदानात दिसून येणार का? हा प्रश्न आहे.
भाजपने रावेरकडे वळविले लक्ष
जिल्ह्यातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता जळगाव शहर, भुसावळ शहर, जामनेर, रावेर, चाळीसगाव याठिकाणी भाजपने आपले उमेदवार उभे केले आहेत. रावेर वगळता इतर जागेवर भाजपचे वरिष्ठ मंडळी लक्ष देत नसून रावेरकडे लक्ष वळविले आहे. अमोल जावळे यांना तारण्यासाठी मोठी फौज मदतीला उतरली असून सभा आणि रॅली आयोजित केल्या जात आहेत. भाजपने रावेरकडे लक्ष वळविले असले तरी इतर चारही मतदार संघात उमेदवारांसाठी निवडणूक सोपी नाही. रावेर विजयाच्या प्रयत्नात इतर चार जागी भाजपला फटका बसण्याची शक्यता असून पक्षश्रेष्ठी ऐनवेळी काय भुमीका घेतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरेल.