
जळगाव मिरर | १६ एप्रिल २०२६
जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे घराच्या पाठीमागील शेतात गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. १५) दुपारी सुमारे ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे फत्तेपूर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुपियान खान चांद खान पठाण (वय १६) असे मृत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुपियान हा दुपारच्या सुमारास आपल्या घराच्या पाठीमागील शेतात गेला होता. यावेळी त्याचा विजेच्या प्रवाहाशी संपर्क आल्याने त्याला जोरदार धक्का बसला आणि तो जागीच कोसळला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.
सुपियान हा अत्यंत आज्ञाधारक, हसतमुख व धार्मिक वृत्तीचा मुलगा म्हणून ओळखला जात होता. त्याच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी गावात पसरताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेकांना अश्रू अनावर झाले. मयत सुपियान हा अत्यंत गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा होता. त्याचे वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ऐन उमेदीच्या वयात झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, मयत सुपियानची अंत्ययात्रा बुधवारी (दि. १६) सकाळी ९ वाजता फत्तेपूर येथील राहत्या घरापासून निघणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे.





















