जळगाव मिरर | १८ जुलै २०२६
भुसावळ तालुक्यातील रहिवासी महिला १२ जुलैपासून भुसावळातून बेपत्ता झाली होती. या महिलेचा मृतदेह तापी नदीपात्रात आढळला असून या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील खंडाळा येथील रहिवासी बेबाबाई फुलसिंग पाटील (वय ७०) ही वृद्ध महिला १२ जुलैला भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजजवळ आली होती. तेथून बेबाबाई पाटील या बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. तर त्यानंतर महिलेचा शोध घेण्यात येत होता.
दरम्यान, या महिलेचा मृतदेह गुरुवारी यावल तालुक्यातील बोरावल जवळील तापी नदीच्या पात्रात आढळला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह यावलच्या ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आला. तेथे डॉक्टरांनी शवविच्छेदन करून तो मृतदेह महिलेच्या कुटुंबीयांकडे सोपवला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नि. रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनात हवालदार नरेंद्र बागुल करत आहेत.




















