जळगाव मिरर | २५ जुलै २०२४
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या शिफारसीवरून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे पाल ता. रावेर येथे नव्याने सुरु करायच्या प्रस्तावित नवीन कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या तपासणी समितीचा येथे पाहणी दौरा बुधवार, 24 जुलै रोजी झाला. समितीच्या बैठकीत सातपुडा विकास मंडळाचे मा. अध्यक्ष व विद्यमान सदस्य आ.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या आदिवासी भागाच्या या कर्मभूमीला कृषी शिक्षणाच्या माध्यमातून अधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी यापुढे झोकून काम करणार कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. रावेर – यावल तालुक्यात कृषी व ग्रामविकास विभागाचे विकासापूरक निरनिराळे उपक्रम राबवणार असतांना आमच्या सातपुडा विकास मंडळाची नियोजित दोन्ही महाविद्यालये राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दोन्ही उत्तम महाविद्यालये बनवण्याच्या वर्षभरात प्रयत्न राहील,अशी समितीला ग्वाही दिली.
पाहणी समितीच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता तथा संचालक (शिक्षण) डॉ.डी.डी.पवार हे होते. समितीमध्ये धुळे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.बी.एम.इल्हे,कृषी विद्या विभागाचे विभागप्रमुख डॉ.आनंद सोळुंखे,कृषी अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.ए. शिंदे,तांत्रिक अधिकारी व सहयोगी प्राध्यापक डॉ.रवी आंधळे व विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव हेमंत सोनार यांचा समावेश होता.
संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोक झांबरे,सचिव श्री.अजित पाटील, मधुस्नेह परिवाराचे ज्येष्ठ सल्लागार प्रभात चौधरी,मधुस्नेह परिवाराचे कृषी व ग्रामविकास विभागाचे समन्वयक विवेक ठाकरे,प्रा.शरद वाणी सर यांनी उपस्थित समितीचे स्वागत करून संस्थेच्या उपक्रमांची माहिती दिली.कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ महेश महाजन यांनी प्रास्ताविक केले.डॉ.धिरज नेहते, प्रा.अतुल पाटील,कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रा.चेतन पाटील यांनी पाहणी दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.