
जळगाव मिरर | ६ मार्च २०२६
लग्न समारंभात वऱ्हाडी असल्याचे भासवित शिरलेल्या चोरट्यांनी नववधुच्या दागिन्यांची पर्स चोरुन नेली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दहा दिवस मध्यप्रदेशातील राजगढ येथे दहा दिवस ठाण मांडून रितीक सिकंदर सिसोदीया, कृषी निरज बेडीया (दोघ रा. कडीया सांयी, तहसील नरसिंहपूर, जि. राजगढ मध्यप्रदेश) या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १ लाख ९२ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
भुसावळ येथील बालाजी लॉन्स येथे दि. ६ फेब्रुवारी रोजी उज्ज्वला प्रबोध भावे त्यांच्या मुलाचा विवाह सोहळा पार पडत होता. दुपारी ४ वाजेच्या सुमारास, नववधूचे दागिने असलेली पर्स सोफ्यावर ठेवलेली असताना अज्ञात चोरट्याने ती लंपास केली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातपोलिसांकडून पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक शरद बागल, उपनिरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, प्रमोद ठाकूर यांचे पथक रवाना केले.
पोलीसांनी लॉन्समधील सीसीटीव्ही फुटेजसह लग्नसमारंभात काढल्या जाणाऱ्या व्हिडीओचे विश्लेषण केले. तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी हे मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडीया सांसी येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पथक मध्यप्रदेशात पोहचले. त्यांनी दहा दिवस तळ ठोकून रीतीक सिंकदर सिसोदीया आणि ऋषी पिता निरज बेडीया या दोन संशयित आरोपींन ताब्यात घेतले. चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिन संशयित कृषी बेडीया याने तो गावाला जात असल्याचे सांगत त्याच्या मावशीचा पती निरोत्तम सिसोदीया याच्याकडे ठेवलेले होते. पोलिसांन ४० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत आणि चांदीच्य लवंगा असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांच मुद्देमाल हस्तगत केला आहे.




















