
जळगाव मिरर | ७ ऑगस्ट २०२३
शहरातून जवळ असलेल्या जैन व्हॅली येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे दोन दिवशीय आनंददायी व निसर्गरम्य वातावरणात, राज्य अभ्यासवर्ग संपन्न झाला. नागपूर , गोंदिया, अमरावती, चंद्रपूर सांगली सातारा नगर पुणे सुमारे २६ जिल्ह्यातून सुमारे साडेसहाशे किलोमीटर अंतरावरून साधक उपस्थित होते.
राज्य कार्यकारिणी अध्यक्ष डॉ.विजय लाड वाघमारे , मेघाताई कुलकर्णी मॅडम, सर्जेराव जाधव गुरुजी, तसेच नाशिक विभाग अध्यक्ष डाॅ अजय सोनवणे , नाशिक विभाग संघटक प्रा संजय शुक्ल, विभाग सचिव डॉ प्रा. आत्माराम महाजन, सहसंघटक अँड.सुरेंद्र सोनवणे, जिल्हाध्यक्ष मनोज जैन, सचीव उदयकुमार अग्निहोत्री , संघटक सतीष गडे डाँ. सोनगिरकर सौ मनिषा पाटील गुरूबंक्ष जाधवानी सह संपूर्ण जळगाव टीमने चोख व्यवस्था ठेवल्याने उपस्थित साधकांना स्नेहमेळाव्याला आल्यासारखे वाटले व त्यांनी संयोजकांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत अभिनंदन केले.
तब्बल एक तपाआधी ग्राहकतीर्थ नानांच्या, पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या, जळगाव येथील जैन हिल्स येथे तीन किलोमीटरचा पिस वाॅक उपक्रम दोनही दिवशी सकाळी राबविण्यात आला. त्यात आपल्या शरीरातील आकाश, अग्नी, जल, वायु, पृथ्वी या पंच तत्त्वाचे व निसर्गातील पंचतत्वे यांची पिंडी ते ब्रह्मांडी यामध्ये असलेली साखळी याबद्दल शास्त्रीय माहिती श्री अश्विनकुमार यांच्याद्वारे देण्यात आली. गांधी तीर्थधाम संग्रहालय पाहणी सर्व साधकांकरिता पर्वणीच होती. मोहन ते महात्मा याचा आविष्कारच गांधींच्या जीवनपटाद्वारे येथे झालेला दिसतो.
अभ्यास वर्गाचे उद्घाटक उद्योगपती सन्माननीय अशोक भंवरलाल जैन यांचे साधे सोपे व उत्तम मार्गदर्शन आणि राज्य अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेत झालेल्या या कार्यक्रमात सर्व साधकांचे बौद्धिक, मानसिक व शारीरिक अभ्यास वर्ग झाल्याचा अनुभव प्रत्ययास आला.उद्घाटन सत्रा मध्ये स्काऊट गाईड पथका तर्फे मान्यवरांचे स्वागतमानवंदना , बालकलाकारांतर्फे गणेश वंदना या उपक्रमानेही उद्घाटन सत्र अविस्मरणीय झाले. विदर्भ प्रांत अध्यक्ष श्री श्यामकांत पात्रीकर यांनी संपादित केलेले व ग्राहकांसाठी बहुमूल्य माहिती देणारे ग्राहक न्याय विशेषांकाचे अनावरण करण्यात आले. नंतर ,राज्य सहसंघटीका सौ मेघाताई कुलकर्णी यांनी ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कार्यपद्धती व रचना याबद्दल विस्तृत माहिती दिली, राज्य संघटक श्री सर्जेराव जाधव गुरुजी यांनी शेतकरी ग्राहक आणि सातबारा याबद्दल दिलेली महत्त्वपूर्ण माहिती, महाराष्ट्रातील विविध जिल्हा अध्यक्ष,संघटक, कोषाध्यक्ष व सचिव यांच्या स्वतंत्र बैठका व कार्यपद्धतीचे सत्र, नानांची डाॅक्युमेंटरी हे महत्त्वाचे बिंदू होते.
दुसऱ्या दिवशी श्री श्यामकांत पात्रीकर यांनी ग्राहक चळवळ, समस्या निवारण, प्रशासकीय निवेदन, संपर्क, कर्तव्य आणि जबाबदारी यावर केलेले विश्लेषण प्रेक्षकांची दाद घेऊन गेले, अँड. प्रा. विजया सिंग मॅडम यांनी नवीन सुधारीत ग्राहक संरक्षण कायदा बद्दल माहिती ओघवत्या वाणीतुन दिली, कायद्याचा कठीण विषय वक्त्यांच्या अमोघ शैलीतुन सर्वसामान्यांनाही बरेच काही देऊन गेला. राज्यसचिव श्री. अरुण वाघमारे यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद ची सांगितलेली कार्यपद्धती आणि त्या अनुषंगाने शासन दरबारी ग्राहकांच्या समस्या मांडण्यासाठी मिळणारे प्रतिनिधित्व याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्याच्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा एस.एन. पाटील यांनी विद्यार्थी ग्राहक जागृती याबद्दल विस्तृत वर्णन केले, डॉ. प्रसन्नकुमार रेदासानी यांनी रक्त या गंभीर विषयावर रेड क्रॉस सोसायटी, ब्लड बँक जळगाव येथे उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्याच बरोबर ग्राहक मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी सुसज्ज दालनही जिल्हाशाखेला उपलब्ध करुन दिले. रेडक्राँस सोसायटीच्या कार्यालयात ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे ग्राहक मार्गदर्शन केंद्रही जनतेसाठी सुरु झाले . समारोपसत्रात सर्वांचे लाडके आणि समर्पित जीवन जगणारे राज्याध्यक्ष डाॅ. विजय लाड यांचे जगत गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांची पगडी व प्रतीमा देऊन जीवन गौरव व यथोचित सत्कार करण्यात आला. अर्थव्यवस्थेचे पंचप्राण सन्मान, विभाग स्तरावर उत्कृष्ट साधक सन्मान करण्यात आला. त्यात विदर्भ प्रांतातील गोंदिया जिल्ह्याचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त व विद्यार्थ्यांसाठी जनजागृती राबविणाऱ्या संघटक सौ. शारदा सोनकनवरे मॅडम यांची , उत्कृष्ट साधक म्हणून तर कोकण विभागातुन शेतीविषयक श्री विलास देसाई यांची यथार्थ निवड केल्याबद्दल राज्य कार्यकारीणीचे उपस्थितांनी कौतुकच केले
शेवटी राज्याध्यक्ष यांनी केलेले मार्गदर्शन हे नेहमीप्रमाणे अनमोल ठरले.
श्री संजय शुक्ला आणि महाजन यांनी बहारदार सूत्रसंचालन केले. विशेष बाब म्हणजे या अधिवेशनाला पहिल्यांदाच 300 चा वर नोंदणी होत असल्यामुळे ती थांबवावी लागली आणि पहिल्यांदाच अधिवेशन ऑनलाइन पद्धतीने साधकापर्यंत घरोघरी पोहोचले.
हा अभ्यास वर्ग म्हणजे सात्विक जेवण, स्वादिष्ट नाष्टा व अति पवित्र निसर्गरम्य परिसरात , गांधी विचाराने भारीत, अधीक श्रावण महिन्यातील ज्ञानकुंभ मेळा, आत्मिक शुद्धतेकडे नेणारा प्रवास व साधकांसाठीचा अभ्यासवर्ग स्नेहमेळावा असाच ठरला . रिमझिम पावसाच्या हजेरीसोबत संपन्न झालेला अभ्यासवर्ग सर्वाना अविस्मरणीय असाच राहील. नाशिक विभाग कार्यकारीणी आणि जळगाव जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी उपस्थित सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करीत निरोप दिला..





















