जळगाव मिरर | २३ जुलै २०२३
अमळनेर तालुक्यातील दोन जणांचा शुक्रवारी बुडून मृत्यू झाला. रढावन येथे एकाचा विहिरीत तर दुसऱ्याचा खदानीत मृतदेह आढळून आला. यात नितीन अंबादास मराठे (४२, रा. मुसळी ता. धरणगाव, ह.मु. रढावण- राजोरे) आणि देवा धाकू पारधी (४०, रा. ताडेपुरा, अमळनेर) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन हा भाऊ शरद, आईसोबत बुधवारी शेतात काम करत होता. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास भाऊ घरी जायला निघाला असता, नितीन याने आपण नंतर येत असल्याचे सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्याचे मामा राजेंद्र चिंतामण काळे यांच्या शेतातील विहिरीत नितीनचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याबाबत अमळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेकॉ. हितेश चिंचोरे करीत आहेत. दुसरी घटना चोपडा रोडवर खदानीत घडली. ताडेपुरा येथील देवा पारधी हा मजुरी करत होता. दोन दिवसांपूर्वी तो कामाला गेला, परंतु घरी परतला नाही. शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवळी शिवारातील खदानीत देवा मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या आतेभावाने खबर दिल्यावरून अमळनेर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हेकॉ सुनील पाटील करीत आहेत.