जळगाव मिरर | १८ सप्टेंबर २०२४
राज्यातील चंद्रपूर जिल्ह्यात शेळ्याना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या दोघा मित्रांचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना जिवती तालुक्यातील आंबेझरी रोडगुडा येथील तलावात घडली. निखिल बाबाराव शिंदे (वय २२), अब्दुल नवाज शेख (वय २४) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही जिवती तालुक्यातील आंबेझरी (रोडगुडा) येथील रहिवाशी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जिवती तालुक्यातील आंबेझरी (रोडगुडा) येथील निखिल बाबाराव शिंदे, अब्दुल नवाज शेख हे दोघे शेळ्या, मेंढ्या चराईसाठी नियमित जात होते. सोमवारी (दि.१६) दोघेही शेळ्या, मेंढ्याचा कळप घेऊन चराईसाठी शिवारात गेले होते. त्यांनी शेळ्याना चारल्यांनंतर पाणी पाजण्यासाठी तलावात आणले. तलावात शेळ्या पाणी पीत असताना दोघे तलावाच्या काठावर बसले होते. अचानक तोल गेला आणि दोघे तलावातील विहिरीत पडले. विहिरीतून बाहेर निघण्याच्या दोघांनी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तलावाकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह तलावातील विहिरीतून बाहेर काढले. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.