जळगाव मिरर | २२ नोव्हेंबर २०२५
शहरातील दुध फेडरेशन रोड परिसरातील मिथिला अपार्टमेंटमधील साई श्रद्धा लाँड्रीचे मालक योगेश भागवत निंबाळकर यांनी दाखवलेला प्रामाणिकपणा सध्या परिसरात चर्चेत आहे.
दि. 21 रोजी रात्रीच्या सुमारास याच अपार्टमेंटमधील रहिवासी श्री. भावसार यांनी आपले कपडे प्रेस करण्यासाठी लाँड्रीमध्ये दिले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी योगेश निंबाळकर कपडे प्रेस करत असताना त्या कपड्यांमध्ये दोन सोन्याच्या पोत आढळून आल्या. सोन्यासारख्या मौल्यवान वस्तू मिळूनही कोणताही विलंब न लावता त्यांनी तत्काळ भावसार यांच्या घरी जावून मुद्देमाल परत सुपूर्द केला.
अचानक सापडलेल्या सोन्याचे पोत सुरक्षित अवस्थेत परत मिळाल्याने भावसार परिवाराने योगेश निंबाळकर यांचे मनापासून कौतुक करत त्यांचे आभार मानले. प्रामाणिकपणाचा हा आदर्शवत निर्णय परिसरात सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.




















