जळगाव मिरर | १७ जुलै २०२६
शहरातील जळगाव जिल्हा परिषद कार्यालयासमोर रात्रीच्या वेळी दुचाकीस्वाराला अडवून लुटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीला गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला असून, अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीवर यापूर्वीही जबरी चोरीचे दाखल आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ एप्रिल रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास फिर्यादी मुस्तकीन शेख सईद (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे त्यांच्या मोटारसायकलने जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रोडवरून जात होते. यावेळी अज्ञात इसमांनी त्यांच्याजवळील मोबाईल बळजबरीने हिसकावला होता. हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार अक्षय मुकेश अटवाल (वय ३५) यानेच केला आहे.
या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने अक्षय अटवाल याला गुरुनानक नगर, शनिपेठ येथून ताब्यात घेतले. त्याने आपला साथीदार चंद्रकांत रमेश दिवेकर याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे सांगितले. चंद्रकांत दिवेकर (वय २३) यालाही पोलीसांनी १५ जुलै रोजी अटक केली.




















