जळगाव मिरर | २१ जुलै २०२५
रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळ असलेल्या मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा येथे जडीबुटी विकणाऱ्या हरियाणातील दोन जणांना ते मुले पळवणारे असल्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आल्याचे समजत आहे.
सविस्तर वृत्त असे कि, हरियाणातून जडी-बुटी घेऊन काही जण रावेर तालुक्यात आले आहेत. यातील जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) आणि मोनूनाथ जस्सानाथ (वय २०, दोन्ही रा. सिरसा, हरियाणा) हे दि.२० रोजी सकाळी रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथे आले होते. त्यांनी गावातील एका व्यक्तीला नसा दुखत असल्याच्या व्याधीची तपासणी केली. यानंतर तो व्यक्ती घरी जाऊन इतर लोकांना घेऊन आला. हे दोन व्यक्ती मुले पळवणाऱ्या टोळीतील असल्याच्या गैरसमजातून त्यांना या लोकांनी मारहाण सुरू केली. यामुळे या दोन्ही जणांनी त्यांच्याकडे असलेल्या एचआर १३ ई ६५१६ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पलायन केले. यानंतर हे दोन्ही जण प्रचंड वेगाने मुंजलवाडी सोडून कुसुंब्याकडे पळाले. तेथे लोकांनी त्यांना अडवून पुन्हा मारहाण केली यानंतर तेथून आपला जीव वाचवून ते वेगाने पळाले असताना त्यांचा एका व्यक्तीला कट लागला. यानंतर परिसरातील लोकांनी लोहारा येथे या दोन्ही जणांना गाठून त्यांना पुन्हा मारले. तसेच त्यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड देखील करण्यात आली असल्याची समजते.
दरम्यान, सावदा पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने या दोन जणांनाची सुटका झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर सावदा पोलीस स्थानकात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील पहिला गुन्हा हा इकबाल मोहंमद तडवी यांनी दाखल केला असून, त्यांना या दोन्ही जडिबुटी विकणाऱ्याच्य गाडीचा कट लागल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. दुसरी तक्रार ही जडीबुटी विकणाऱ्यांच्या वतीने केल्याने त्यांना मारहाण करणाऱ्यांना अज्ञात व्यक्तींना आरोपी करण्यात असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास स.पो.नी. विशाल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सावदा पोलीस करीत आहेत.
