जळगाव मिरर | ११ फेब्रुवारी २०२५
शहरातील एमआयडीसी परिसरातील रेमंड चौफुली जवळ भरधाव वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने १९ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण हा गंभीर जखमी असून रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान इयत्ता बारावीच्या मंगळवारपासून परीक्षा असून त्याकरिता बैठक व्यवस्था पाहण्यासाठी दोघे तरुण जळगावात येत होते, अशी माहिती मिळाली. घटनेप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, मोहित संजय मोरे (वय २०, रा. उमाळा ता. जळगाव) असे तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. फार्मसीच्या प्रथम वर्षांत शिक्षण घेत होता. दरम्यान उमाळा गावातील गौरव अशोक पाटील (वय १८) याची मंगळवारपासून बारावीची परीक्षा असल्यामुळे जळगावात बैठक व्यवस्था पाहण्यासाठी गौरव सोबत मोहित मोरे हा जळगाव येथे येत होता. दुपारी १ वाजेच्या सुमारास हॉटेल जवळ आले असताना मागून भरधाव वाहनाने धडक दिली.
या धडकेत दुचाकीस्वार रस्त्यावर जोरात पडले. त्यात दोघं गंभीर जखमींना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोहित मोरे याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पुढील कार्यवाहीसाठी त्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.