जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२५
सध्या दिवाळीचा सण सुरु असताना बाहेरगावी कामासाठी गेलेल्या तरुण – तरुणी व परिवार आपल्या मूळगावी येत आहे. तर नाशिक रोड परिसरात शनिवारी रात्री एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12546) मधून तीन युवक खाली पडले. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्मभूमी एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 12546) ही शनिवारी लोकमान्य टर्मिनसहून बिहारमधील रक्सौलकडे निघाली होती. शनिवारी रात्री 8 वाजून 18 मिनिटांनी ही रेल्वेगाडी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर न थांबता पुढे गेली. ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला तीन युवक रेल्वेतून खाली पडल्याची माहिती दिली. माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिथे दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळला. जखमी युवकाला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही दुर्घटना जेल रोडवरील हनुमान मंदिराजवळील ढिकलेनगर परिसरात किलोमीटर 190/1 ते १९०/3 दरम्यान घडली.
प्राथमिक अंदाजानुसार, दिवाळी सणाच्या निमित्ताने उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी आहे. यामुळे काही प्रवासी रेल्वे डब्याच्या दरवाजाजवळ उभे राहतात. सदरील अपघाग्रस्त युवक देखील दरवाजाजवळ थांबले असावे आणि त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले असावेत. हे तिघे युवक मुंबईत काम करणारे असून दिवाळीसाठी आपल्या गावी बिहारला जात असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
रेल्वेतून प्रवासी खाली पडल्याचे इतर प्रवाशांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला. अपघाताची माहिती मिळताच नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक माळी आणि हवालदार भोळे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. जखमी युवकास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, मृत व जखमी युवकांची ओळख अद्याप पटलेली नाही. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असल्याने, रेल्वेच्या दरवाजाजवळ उभे असताना तोल जाऊन हे तिघे खाली पडल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. संबंधित युवक दिवाळी साजरी करण्यासाठी गावी जात होते की बिहार विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी निघाले होते, याबाबत तपास सुरू आहे.