जळगाव मिरर | ४ नोव्हेंबर २०२६
दहा हजारांची लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतिष शिसोदे यांच्या आदर्श नगरातील घर झडतीमध्ये ७ लाख ९७ हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. तसेच दोघ लाचखोर अभियंत्यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे अतंर्गत रस्ते काँक्रीकरणाचे बिल व मोजणी पुस्तिका तयार करण्यासाठी कनिष्ट अभियंता भागवत चवरे याने या पूर्वी कामाच्या सब कॉन्ट्रॅक्टरकडून २० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर तक्रारदार उपविभागीय अधिकाऱ्यांकडे कामाविषयी विचारणा करण्यासाठी गेले असता एकूण बिलाच्या दीड टक्के रकमेची अर्थात १५ हजार रुपयांची लाच उप विभागीय अधिकारी सतीश शिसोदे याने मागितली. या विषयी सब कॉन्ट्रॅक्टरने दि. २ नोव्हेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने पडताळणी केली असता शिसोदे याने लाचेची मागणी करून ती स्वीकारली. याप्रकरणी दोघांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकेत असलेल्या उपविभागीय अधिकारी सतिष शिसोदे व कनिष्ठ अभियंता भागवत चवरे या दोघांना मंगळवार दि. ३ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
सतीश शिसोदे यांच्या खिशात १७ हजार १२० रुपये तर टेबलच्या ड्रॉवरमध्ये ७४ हजार ५०० रुपये सापडले होते. घरझडतीत ७ लाख ९७ हजार ९२० रुपये रोख सापडले. तसेच शिसोदे याच्या पत्नीच्या नावे बँकेमध्ये २ लॉकर असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यात दागिने अथवा रोकड असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने शिसोदे याच्या उपस्थितीत लॉकरची झडती घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोघ अभियंत्यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडले. दरम्यान, लाच घेतांना पकडलेल्या कनिष्ट अभियंता भागवत चवरे हा शिसोदे याच्यासाठी कंत्राटदारांकडून लाच गोळा करत असल्याची गोपनीय माहिती एसीबी पथकाला मिळाली आहे. त्यामुळे भागवत चवरे यांची कसून तपासणी केली जाणार असून त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे




















