जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२६
अंधाराचा फायदा घेत शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकर नगरातील एका गल्लीत सात महिन्यांचे मृत पुरुष जातीचे अर्भक मंगळवार दि. ११ रोजी आढळून आले. रक्ताने माखलेल्या अवस्थेत हे अर्भक आढळून आल्यामुळे खळबळ माजून गेली होती. दरम्यान, पहाटे अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने ते अर्भक फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी शनिपेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील जूने जळगावातील आंबेडकर नगरातील एका अरुंद गल्लीत रक्ताने माखलेल्या अवस्थेत सात महिन्याचे अर्भक आढळून आले. मंगळवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गल्लीतील राहणाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी घटनेची माहिती तात्काळ शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह पोलीस अंमलदार विजय खैरे, महिला पोलीस अंमलदार काजल सोनवणे हे घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमला देखील पाचारण करण्यात आले होते. त्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. त्यानंतर मृत अर्भक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषीत केल्यानंतर शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातील गल्लीतील रस्त्यावर अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने अर्भक फेकून तेथून पळ काढल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




















