
जळगाव मिरर | २७ मार्च २०२६
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका घेत, व्हिडिओंची सत्यता पडताळल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या सोशल मीडियावर फिरत असलेले व्हिडिओ अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या सत्यतेची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. हे व्हिडिओ खरे असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, मंत्री नरहरी झिरवळ यांनी स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. व्हायरल झालेले व्हिडिओ हे तीन-चार वेगवेगळे क्लिप्स एकत्र करून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली.
यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी झिरवळ यांना अधिकृत तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला असून, त्यानंतर यंत्रणांकडून संपूर्ण प्रकरणाची शहानिशा केली जाईल, असे सांगितले. या प्रकरणात पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, सत्य समोर आल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. यासंदर्भात सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षस्तरावरही चर्चा करून योग्य तो निर्णय केला जाईल. सध्या या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, पुढील चौकशी अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





















