
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२५
महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना कृषिमंत्री असंवेदनशीलपणे वागत आहेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर केली. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तूर, द्राक्ष, कांदा, भाजीपाला अशा पिकांचे नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषिमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील आहे, अशा शब्दांत विजय वडेट्टीवार यांनी माणिकराव कोकाटेंच्या विधानाचा समाचार घेतला.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे काल नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी शेतकऱ्यांनी त्यांना शेतकरी कर्जमाफीबाबत विचारले असता, त्यांनी शेतकऱ्यांनाच सुनावले. कर्जमाफी मिळाल्यानंतर त्या पैशांचे काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक करता का? असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना केला. त्यांच्या या विधानाचा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी समाचार घेत सरकारवर जोरदार टीका केली.
हाताशी आलेले पिक गेल्याने बळीराजा अडचणीत असताना त्यांना समजून घेण्याऐवजी महायुतीच्या मंत्र्यांची भाषा अरेरावीची आहे. बहुमत मिळाल्याने कोणी आमचे वाकडे करू शकणार नाही असेच या मंत्र्यांना वाटत असल्याने शेतकऱ्यांना सरकारने वाऱ्यावर सोडले आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ दे, त्यांचे नुकसान होऊ दे महायुती सरकारला सामान्य जनता, शेतकऱ्यांशी देणे घेणे नाही. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असताना अशा वेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कृषीमंत्र्यांची भाषा ही असंवेदनशील आहे. राज्यात अवकाळी पाऊस झाल्याने पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे ही आमची मागणी आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत.
गेल्या तीन-चार दिवसांत अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. साधे पंचनामे करण्याची सुद्धा गरज या सरकारला भासली नाही. तसे आदेश सुद्धा दिलेले नाहीत. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. मदत नंतर करा, पण पंचनाम्याची तरी तसदी घ्या, अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केला. पंचनामे करण्याची देखील तसदी सरकार घेत नाही, इतके हे सरकार निर्ढावलेले आणि शेतकरी विरोधी सरकार खुर्चीवर बसलेले आहे.





















