जळगाव मिरर / १ फेब्रुवारी २०२३
चोपडा शहरात निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून सागर ओतारी यांनी सोमवारी पालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिला. पाणी उपलब्ध असतांना आठ दिवसाआड होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे शहरात निर्माण झालेल्या असंतोषाला सागरभ ओतारी यांनी वाचा फोडली. दरम्यान, मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. परिणामी, पंधरा दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. आक्रमक भूमिका घेतल्यामुळेच पाणी पुरवठा सुरळीत होणार असल्याने उपस्थिती महिला व पुरुषांनी सागरभाऊ ओतारी यांचे आभार व्यक्त केले.
चोपडा शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन ढासळले असून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गरज नसतांना प्रत्येक झोनला साडेतीन तास पाणीपुरवठा केला जातो. परिणामी, हजारो लिटर पाण्याची नासाडी सुरु आहे. शिवाय, शहरातील अनेक भागात अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याच्याही तक्रारी असून याबाबत नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. चोपडा शहारासाठीचे समर्पित नेतृत्व सागरभाऊ ओतारी यांनी या असंतोषाला आज वाट करून दिली. आठ दिवसात कृत्रिम पाणीटंचाईचे संकट दूर करून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नवव्या दिवसापासून पालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा सागरभाऊ ओतारी यांनी निवेदनातून दिला. पाणी समस्ये संदर्भात सागरभाऊ निवेदन देत असल्याचे समजताच शहरातील विविध परिसरातील महिला आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे पालिकेत धाव घेतली.
मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी आपल्या दालनात सागरभाऊ आणि उपस्थित नागरिकांशी चर्चा केली. आठ दिवसाच्या अल्टिमेटमवर ठाम असलेल्या सागरभाऊ यांना तांत्रिक अडचणींची माहिती देत आठ दिवसातच, आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न राहील. मात्र, पंधरा दिवसांची मुदत द्या अशी विनंती मुख्याधिकारी निकम यांनी सागरभाऊ ओतारी यांना केली. निकम यांच्या विनंतीला प्रतिसाद देत सागरभाऊ ओतारी यांनी पंधरा दिवसात शुद्ध आणि आठवड्यातुन दोन वेळा पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास सोळाव्या दिवसापासून पालिकेसमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. चोपड्यात निर्माण झालेली पाणी टंचाई कृत्रिम असून पाणीपुरवठा विभागातील काही झारीच्या शुक्राचाऱ्यांमुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे. या शुक्राचाऱ्यांचा बंदोबस्त तुमच्याने शक्य नसेल तर आम्ही करू असा इशाराही सागरभाऊ ओतारी यांनी दिला. याप्रसंगी माळी समाजाचे पंच शालिकनाना महाजन, महेंद्र महाजन, छोटू भाट, पिंटू धनगर, विलास माळी, प्रमोद महाजन, अजय बाविस्कर, नंदू पाटील, विकी जाधव, काशी महाजन, निलेश महाजन, गोकुळ धनगर, दीपक पाटील, संजय सोनार, मुजम्मिल सैय्यद, नर्मदाबाई माळी, माधुरी लोहार, सुमनबाई महाजन, आक्काबाई बडगुजर, अलकाबाई लोहार, शोभाबाई महाजन, दिव्याबाई माळी, रंजना माळी, आरती लोहार, प्रीतीबाई पाटील, कल्पना धनगर यांसह असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
तर, प्रशासनाचे धन्यवादच ! – सागर ओतारी
पाणी मुबलक प्रमाणावर उपलब्ध असून नवीन जलशुद्धीकरण केंद्राची सुद्धा यशस्वी चाचणी झाली आहे. परिणामी, योग्य नियोजन केले तर चोपडा शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सहज शक्य आहे. मात्र, तांत्रिक अडचणी असल्याचे मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी सांगून आठवड्यातून दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे मान्य केले आहे. श्री. निकम हे कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांनी ठरविले तर तीन दिवसाआड सुद्धा पाणीपुरवठा शक्य आहे. त्यांना पाहिजे ते सहकार्य आपण करून. तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत झाला तर मुख्याधिकारी हेमंत निकम यांचा सत्कार करू अशी भूमिका याप्रसंगी सागरभाऊ ओतारी यांनी घेतली.