जळगाव मिरर । १ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून आपल्या वादग्रस्त विधानाने नेहमीच चर्चेत येणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जयंत पाटील हे ‘राजारामबापूंची औलाद नाहीत’ असे आपण बोललो हे सत्य असून, आपल्या वक्तव्यावरून माघार घेणार नाही, अशी भूमिका पडळकर यांनी घेतली.
मागील काही दिवसांपूर्वी गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांच्या वडिलांवरुन आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. त्यांच्या त्या विधानावरुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समज दिला होता. आता पुन्हा गोपीचंद पडळकांची जयंत पाटलांवर ताशेरे ओढले आहेत.
विरोधकांकडून नेहमी पडळकरांवर टीका करताना मंगळसूत्र चोर म्हणून टीका केली जाते. यावरुन संतापलेल्या गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटीलांना खोचक सवाल केला आहे. गोपीचंद पडळकर एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, ‘जयंत पाटील यांनी मला मंगळसूत्र चोर म्हटले आहे. त्यांनी सांगावं की त्यांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरले आहे? सांगलीत यांनी महाराष्ट्र संस्कृती बचाव सभा घेतली आणि मला आई-बहिणींवरुन शिव्या दिल्या. मला गोप्या म्हटले पण याची कुठे चर्चा झाली का? चाळीस हजाराच्या फरकाने निवडून दिलेल्या विधानसभेच्या आमदाराला हे शिव्या देतात. मला गोप्या म्हटले तर फरक पडणार नाही, कारण मी सामान्य घरातील मुलगा आहे, पण तुम्हाला जंत्या म्हटले तर चालेल का?,’ असा एकेरी उल्लेख ही आमदार पडळकर यांनी केला.
‘तुम्ही जर जातीवंत पाटील असाल तर तुम्ही उद्या दुपारी पत्रकार परिषद घ्या. गोपीचंद पडळकरने इश्वरपूरमध्ये यायचं की वाळव्यात यायचं, दिनांक, वार आणि वेळ सांगा मी तिथे येतो. माझ्याकडे पोरं पाठवायची गरज नाही आणि तुमच्याकडे ती हिंमत नाही. तुम्ही सांगाल तिथे मी येतो,’ असे आव्हान देखील पडळकरांनी जयंत पाटील यांना दिले आहे. “गोपीचंद हा फकीर माणूस आहे, ना मला आगा ना पिछा. मला बदनाम करून मी संपणार नाही. अनेक गावठी कुत्र्यांना तुडवत तुडवत मी इथंपर्यंत आलोय. माझ्या विरोधातमध्ये अनेक वादळं, त्या वादळात उभे राहतो तो गोपीचंद पडळकर. जतमधील मायबापांनी मला निवडून दिलं. पण माझ्यावर टीका करणारी ही औलाद हिंदू विरोधी आहे, त्याला जागा दाखवायची वेळ आली आहे,” अशा शब्दात पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली.
दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी याआधीही जयंत पाटील यांच्या विषयी खालच्या भाषेत टीका केली होती. त्यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करत नाराजी व्यक्त केली होती. फडणवीस यांनी देखील आम्ही या वक्तव्याचे समर्थन करत नसल्याचे म्हटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या तंबीनंतरही आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे.