जळगाव मिरर | ५ नोव्हेंबर २०२५
उत्तरप्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी घडलेल्या एका भीषण अपघातात सात भाविकांचा रेल्वेखाली येऊन मृत्यू झाला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी आलेले भाविक रेल्वे रुळ ओलांडत असताना कालका एक्सप्रेस गाडीने त्यांना धडक दिली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता चोपन येथून आलेली पॅसेंजर ट्रेन चुनार स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. गंगास्नानासाठी आलेले भाविक या गाडीतून उतरले. गंगाजवळ जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून त्यांनी प्लॅटफॉर्म क्रमांक ३ ओलांडत रेल्वे रुळ पार करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी हरियाणातील कालका येथून हावडा दिशेने वेगाने धावणारी कालका एक्सप्रेस तिथून आली. गाडीला चुनार येथे थांबा नव्हता, त्यामुळे ती थेट भाविकांवर आदळली.
धडक इतकी जबरदस्त होती की काहींचे देहाचे तुकडे तुकडे झाले. सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून, काहीजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर रेल्वे स्थानक परिसरात मोठी गर्दी झाली. नागरिकांनी बचावकार्य सुरू केले. त्यानंतर रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे पोलिस (GRP) घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह आणि अवशेष गोळा करून पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात हलवले. स्थानिक प्रशासनाने अपघातग्रस्त भाविकांच्या ओळखीचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार हे सर्व भाविक कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी आलेले उत्तरप्रदेश आणि बिहारमधील रहिवासी असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरातील धार्मिक वातावरणात शोककळा पसरली आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली असून स्थानक परिसरात सुरक्षेची उपाययोजना वाढवण्यात आली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे.
साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, “भाविकांची मोठी गर्दी असल्याने रेल्वे फाटक किंवा पादचारी पूल वापरण्याऐवजी अनेकांनी थेट रुळ ओलांडण्याचा मार्ग घेतला आणि त्यामुळे ही भीषण दुर्घटना घडली.” या अपघातानंतर रेल्वे स्थानकावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सध्या ती सुरळीत करण्यात आली असून घटनास्थळी पोलिसांची नजीकून पाहणी सुरू आहे.



















