जळगाव मिरर | १ जानेवारी २०२४
राज्याची उपराजधानी गेल्या काही वर्षापासून नियमित गुन्हेगारीच्या धक्कादायक घटनेमुळे नेहमीच चर्चेत येत असतांना आता घरगुती भांडण विकोपाला गेल्याने संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात दगड हाणून खून केला. ही घटना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामठी-गुमथळा मार्गावरील आवंडी येथे रविवारी सकाळी साडेपाच वाजता घडली. पतीचा खून केल्यानंतर पत्नीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कसून चौकशी करून पत्नीनेच खून केल्याचे समोर आणले. आनंद भदूजी पाटील (४५) असे मयताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आवंडी येथे आनंद पाटील हा पत्नी अरुणा पाटील (३८) सोबत राहत होता. त्याला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. आनंद मातीगोट्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे तो दररोज दारू पिऊन घरी यायचा. यामुळे आनंद व अरुणामध्ये नेहमी भांडण होत होते. शनिवारी रात्री त्यांच्यात भांडण झाले. भांडण विकोपाला गेल्याने पहाटे पाच वाजता अरुणाने पती आनंद झोपला असताना त्याच्या डोक्यावर दगडाने वार केले. यात आनंदचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पती मरण पावल्यानंतर अरुणाने कोणाला काहीही न सांगता घराला कुलूप लावले. रविवारी सायंकाळी चार वाजता नवीन कामठी पोलीस ठाण्यात आली. तिने पती हरविल्याची तक्रार दाखल केली. अरुणाच्या वागण्यावर पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिची कसून चौकशी केली. तिने पती आनंद पाटीलचा डोक्यावर दगड घालून खून केल्याची कबुली दिली.