
जळगाव मिरर | १६ मार्च २०२६
दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात थार कार अनियंत्रित होऊन थेट पाटचारीत कोसळल्याची घटना रविवारी दुपारी यावल-भुसावळ रस्त्यावर घडली. या अपघातात कार चालक गंभीर जखमी झाला असून नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी त्याला जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील चेतन राजेंद्र तायडे (वय २८) हा तरुण रविवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास थार कार (क्र. एमएच १९ झेड ७७) घेऊन यावल-भुसावळ रस्त्याने यावलच्या दिशेने येत होता. शहराबाहेरील पाटचारीच्या पुलाजवळ पोहोचताच अचानक त्याच्या कारसमोर एक दुचाकीस्वार आला. त्याला धडक लागू नये म्हणून चेतन तायडे याने तातडीने ब्रेक दाबला. मात्र अचानक ब्रेक लागल्याने कारवरील ताबा सुटून वाहन अनियंत्रित झाले आणि थेट पुलाशेजारील पाटचारीत कोसळले.
या अपघातात चेतन तायडे गंभीर जखमी झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमीला बाहेर काढले आणि यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथे डॉ. इरफान खान, डॉ. रोहित कोळी व अधिपरिचारक जॉन्सन सोरटे यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. जखमीची प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारासाठी त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेमुळे काही काळ परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.




















