
जळगाव मिरर | १ ऑक्टोबर २०२५
अमळनेर शहराजवळ टाकरखेडा रस्त्यावर सती माता मंदिरावरून परत येत असताना दुचाकीस्वार दाम्पत्याचा अपघात झाला. रस्त्यावर अचानक गाय आडवी आल्याने मोटारसायकलचा तोल गेल्यामुळे झालेल्या या अपघातात पत्नीचा मृत्यू झाला असून, पती जखमी झाले आहेत. ही घटना ३० सप्टेंबर रोजी दुपारी २:१० वाजता घडली.
सविस्तर वृत्त असे कि, मृत महिलेचे नाव मंगलाबाई मधुकर ठाकरे (वय अंदाजे ५५) असून, जखमींचे नाव मधुकर ठाकरे (वय अंदाजे ६०) आहे. हे दोघे आर. के. नगर, अमळनेर येथील रहिवासी असून, दर्शनासाठी सती माता मंदिर (टाकरखेडा रस्ता) येथे गेले होते. दर्शन करून परत येताना, बुलढाणा अर्बन बँकेच्या गोदामाजवळ अचानक रस्त्यावर गाय आडवी आली. गाय वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकीचा तोल जाऊन अपघात झाला. या अपघातात मंगलाबाई यांना डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या दूर फेकल्या गेल्या व जागीच मृत्युमुखी पडल्या. पती मधुकर ठाकरे यांच्या तोंडाला दुखापत झाली असून, त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, अपघाताबाबत अशोक ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत नोंद झाली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.




















