जळगाव मिरर | १९ मार्च २०२५
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक थरारक घटना समोर आली आहे. मूलबाळ होत नसलेल्या पत्नीने झोपेत असताना पतीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना जिल्ह्यातील लासूर स्टेशन येथे १२ मार्च रोजी घडली आहे. याप्रकरणी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तिला अटक करण्यात आली. पमुसिंग छगनसिंग पपैय्या (वय ६४ ) असं हत्या झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकाचे नाव आहे. तर भारती पमुसिंग पपैय्या (वय ५१) असं आरोपी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पमुसिंग आणि भारती हे दोघे जण लासूर स्टेशन येथील हनुमान मंदिराजवळ राहत होते. लग्नानंतर अनेक वर्षे मूलबाळ होत नसल्याने संतापलेल्या मनोरुग्ण पत्नीने सेवानिवृत्त शिक्षक पतीची रात्री झोपेत हत्या केली. १३ मार्च रोजी पमुसिंग यांचा मृतदेह घरातील जिन्याखालील हौदाच्या पाण्यात तरंगताना आढळून आला होता. मुलबाळ होत नसल्यामुळे सुरूवातीला पोलिसांनी त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करून घेतली आणि तपास सुरू केला.
दरम्यान, या घटनेचा तपास सुरु असताना पोलिसांना संशय आला आणि त्यांनी भारती पपैय्या यांची चौकशी केली. या चौकशीदरम्यान त्यांनी पतीच्या हत्येची कबुली दिली. आपण दगडाने ठेचून पती पमुसिंग यांची हत्या केली असल्याचे त्यांनी सांगितले. लग्न झाल्यापासून मुलबाळ होत नव्हते म्हणून आमच्यात कायम खटके उडायचे. सदर घटनेच्या दिवशी याच कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. रात्री पलंगावर झोपेत असलेल्या माझ्या नवऱ्याच्या डोक्यात दगड घालून खून केला.
कोणाला खुनाचा संशय येऊ नये म्हणून त्याचा मृतदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात नेऊन टाकला, अशी कबुली आरोपी भारती पपैया हिने पोलिसांना दिल्याची माहिती शिल्लेगाव पोलिसांनी दिली. आरोपी भारती पपैय्या या मनोरुग्ण आहेत. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना गंगापूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. सध्या त्यांना हर्सूल कारागृहात ठेवण्यात आले आहे.