जळगाव मिरर | २२ जुलै २०२६
“इतरांच्या घरात दिवे पेटवणारा” महावितरणचा कर्तव्यदक्ष वायरमन शरद बन्सीगीर गोसावी (वय ३४) यांचा भर पावसात वीजवाहिनी दुरुस्त करताना शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना २१ जुलै रोजी सकाळी सुमारे १०.४५ वाजता अमळनेर शहरातील भगवा चौक परिसरात घडली. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मृतदेह थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात नेऊन निषेध व्यक्त केला. अधिकाऱ्यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरातील डी.डी. नगर येथील रहिवासी शरद गोसावी हे महावितरणमध्ये वायरमन म्हणून कार्यरत होते. भगवा चौक परिसरात तुटलेली वीजवाहिनी जोडण्याचे काम सुरू असताना ते विजेच्या खांबावर चढले होते. त्या खांबावर दोन डीपींचा विद्युत पुरवठा होता. एका डीपीचा वीजप्रवाह बंद करण्यात आला होता, मात्र दुसऱ्या डीपीवरील विद्युत प्रवाह सुरूच होता.
काम सुरू असतानाच अचानक गोसावी यांच्या पायाला जोरदार विजेचा धक्का बसला. शॉक लागल्याने ते काही क्षण विद्युतवाहिनीला चिकटून राहिले आणि त्यानंतर खाली कोसळले. सहकाऱ्यांनी व नागरिकांनी त्यांना तातडीने जवळील नर्मदा फाउंडेशन रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले. संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेतून मृतदेह थेट तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारात आणत संबंधितांच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी धाव घेत नागरिकांची समजूत काढली. संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
त्यानंतर शरद गोसावी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. डॉ. जयेश शिंदे यांनी शवविच्छेदन केले असून, विजेचा शॉक लागल्यानेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुसळधार पावसात आर. के. नगर परिसरातील तिरळा झालेला वीजवाहिनीचा खांब आणि रोहित्र जीवाची पर्वा न करता दुरुस्त करून नागरिकांच्या घरातील वीजपुरवठा सुरळीत करणारे शरद गोसावी आज त्याच कर्तव्याच्या वेळी काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती धरणगाव उपविभागीय कार्यालयाला देण्यात आल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गोसावी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अनुकंपा तत्त्वावर कुटुंबातील एका सदस्याला नोकरी, भविष्य निर्वाह निधी, १० लाख रुपयांचा विमा, १५ लाख रुपयांचा कार्यालयीन विमा तसेच इतर देय आर्थिक लाभ तातडीने उपलब्ध करून देण्यात येतील, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली.




















