जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२५
राज्यातील महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव हे सध्या नाराज असल्याचे दिसून येत आहे. माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळाली नाही, हे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे गटात चिंता पसरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाचे अनेक नेते त्यांना जय महाराष्ट्र करत आहेत. त्यात जाधव यांनी देखील थेट नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे ठाकरे यांना कोकणात पुन्हा मोठा धक्का बसतो का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या विषयी एका वृत्त वाहिनीशी बोलताना भास्कार जाधव म्हणाले की, माझी राजकारणाची सुरुवात झाली त्याच वेळी मला हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर भाषण करण्याची संधी मिळाली. त्यावेळच्या शिबिरात मला हमखास भाषण करायला संधी मिळायची. त्या वेळेला शिवसेना नेते कै. मनोहर जोशी सरांना बाळासाहेब अनेक वेळा म्हणाले की, या मुलाला महाराष्ट्रात फिरवायचे आहे.
या मुलाला महाराष्ट्रात फिरवले तर ग्रामीण भागातला, तळागाळातला मानूस आपल्या सोबत जोडला जाईल. असे शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद मला लाभले. महाराष्ट्र मध्ये मला मानणारा एक वर्ग आहे, मी लोकांशी संवाद साधतो त्यावेळी त्यात कोणताही नाटकीपणा नसतो, मला खोटे बोलण्याची सवय नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावते. मात्र प्रत्येक वेळी माझे दुर्दैव आडवे आले आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही, हे माझे दुर्दैव असल्याचे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री उदय सामंत खरोखरच माझ्याबद्दल मोठ्या आदराने बोलत आहेत. तसे ते वागत सुद्धा आहेत. त्यांच्या मनात काय असेल ते माहीत नाही. परंतु चार चौघांमध्ये वागत असताना माझ्या ज्येष्ठतेचा, माझ्या अनुभवाचा त्यांनी बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे. अशात ते माझ्याबद्दल आदराने देखील बोलायला लागले आहेत. म्हणूनच मी त्यांना एवढेच सांगेल की, तुमचे हे प्रेम, तुमचा हा आदर असाच कायम ठेवा. अशा शब्दात भास्कर जाधव यांनी उदय सामंत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.