जळगाव मिरर | १० जानेवारी २०२४
देशातील अनेक राज्यात थंडीचा कहर वाढला आहे. या थंडीपासून बचाव होण्यासाठी अनेक शहरात ठीक ठिकाणी शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव केला जात असतो. मात्र, याच शेकोटीने एकाच परिवारातील ५ जणांचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरोहा जिल्ह्यातील अल्लीपूर भुड गावात रईसुद्दीन शेख आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.८ जानेवारी सोमवारी थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी घरात चूल पेटवली होती. रात्री जेवण केल्यानंतर शेख कुटुंबीय झोपण्यासाठी गेले. मात्र, चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे संपूर्ण घर भरून गेले. घरातून अचानक मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याने गावकऱ्यांनी शेख यांच्या घराकडे धाव घेतली. आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्याने गावकऱ्यांनी दरवाजा तोडला.
लोकांनी आत जाऊन पाहिले असता शेख कुटुंबातील ७जण बेशुद्ध अवस्थेत पडले होते. चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे संपूर्ण घर भरून गेले. दरम्यान, गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. शेख कुटुंबातील ७ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, यातील ५ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुदैवाने या घटनेत दोघांचा जीव वाचला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. चुलीमधून निघणाऱ्या धुरामुळे ५ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे.