
जळगाव मिरर | ३० जुलै २०२४
राज्यातील नवी मुंबई येथील उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांडातील मुख्य आरोपी दाऊद शेखला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटकमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला आता नवी मुंबईमध्ये आणले जात आहे. नवी मुंबई पोलिसांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. यशश्रीची हत्या झाल्यापासून दाऊदचा शोध सुरू होता. यासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली होती. मात्र अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यशश्रीची हत्या झाल्यापासूनच दाऊद शेख फरार होता. यशश्रीच्या शरीराची विटंबना करून तिची हत्या करणारा नराधम दाऊद शेखला शोधण्यासाठी पोलिसांनी आपली संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. अखेर कर्नाटकातून दाऊदला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे. दाऊद शेख व्यतिरिक्त याप्रकरणात आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, यशश्री शिंदे हिच्या हत्येपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला होता. यामध्ये आरोपी दाऊद शेख हा तिचा पाठलाग करत असल्याचे दिसून येत आहे. सीसीटीव्हीतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हत्या झाली त्या दिवशी यशश्री शिंदे हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत होती. तिच्या पाठोपाठ अवघ्या 10 मिनिटांतच दाऊद शेख जाताना दिसला होता. व्हिडिओमध्ये यशश्री शिंदे ही रस्त्याने जाताना दिसून येत आहे. त्याचवेळी आरोपी दाऊद हा तिचा पाठलाग करत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.





















