
जळगाव मिरर | १४ ऑक्टोबर २०२३
गेल्या अनेक महिन्यापासून जळगाव जिल्ह्यातील मनसेच्या विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष पद रिक्त होते. त्यावर आज अखेर योगेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देखील देण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे, विद्यार्थी सेनेचे संदीप पाचंगे, अखिल चित्रे यांची उपस्थिती होती.
नियुक्तीपत्रात म्हटले आहे कि, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हा अध्यक्ष जळगाव जिल्हा (जळगाव लोकसभा) या पदावर योगेश पाटील यांची नेमणूक करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार ध्यानात ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक संस्था यांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. त्यासाठी आपल्या पिढीसमोरील विविध शैक्षणिक आव्हानांचा समस्यांचा अभ्यास आणि प्रसंगी आंदोलनं करण्यासाठी तुम्ही सदैव सज्ज रहायलाच हवं. मला पूर्ण विश्वास आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना’ अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची ओळख निर्माण करण्यासाठी माझ्यासोबत तुम्हीही झपाटून काम कराल. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील तुमच्या भावी वाटचालीला शुभेच्छा. त्यांच्या या निवडीबद्दल मनसेचे जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्याचा वर्षाव केला आहे.
कोण आहेत योगेश पाटील !
जळगाव शहरात गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र सैनिक म्हणून कार्यरत असलेले योगेश पाटील यांना आज मनवीसे जिल्हाध्यक्ष पद मिळाले आहे. त्यांची सुरुवात अगदी महाराष्ट्र सैनिक या पदावरून झाली आहे. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयाच्या शाखाध्यक्ष पद, मनविसे शहर सचिव, उपाध्यक्ष , शहराध्यक्ष व आता थेट जिल्हाध्यक्ष पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. विध्यार्थ्यांसाठी नेहमीच आंदोलनात आक्रमक चेहरा व कार्यकर्त्यासोबत असलेला जनसंपर्क त्यासोबतच संघटन करण्याची धमक त्यांच्यात आहे.