जळगाव मिरर | ५ मार्च २०२५
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असतांना समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले असताना, आता यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमींना एकदा उत्तर प्रदेशला पाठवा, आम्ही उपचार करू, अशा शब्दात योगी आदित्यनाथ यांनी टीका केली आहे.
अबू आझमी यांनी औरंगजेबचे कौतुक केले होते. ‘औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता. त्याने अनेक मंदिरं बांधली होती’, असे वक्तव्य आझमी यांनी केले होते. त्यानंतर सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आझमी यांना निलंबित करण्यात आले आहे.
अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या विधान परिषदेला संबोधित करताना सडकून टीका केली आहे. आझमींवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘इस्लामीकरण करणाऱ्यांना समाजवादी पक्ष आदर्श मानते. औरंगजेबला समाजवादी नायक मानतात. औरंगजेब हा एक क्रूर शासक होता. त्याने त्याच्या वडिलांनाच तुरुंगात टाकले होते. देव करो की असा कमनशिबी कोणाच्या पोटी जन्माला येऊ नये.’
अबू आझमींना एकदा यूपीला पाठवा. आम्ही त्याच्यावर उपचार करू. त्याला भारतात राहण्याचा अधिकार असावा का? समाजवादी पक्षाने यावर उत्तर द्यायला हवे. अबू आझमींना पक्षातून का काढले जात नाही?, असा सवाल देखील योगी आदित्यनाथ यांनी विचारला आहे. दरम्यान, अबू आझमींच्या औरंगजेबावरील वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे. आझमी यांना आता अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. त्यानंतर निलंबनाचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला.
अबू आझमी यांनी औरंगजेबचे कौतुक करत त्याने मंदिरं बांधली होती असा दावा केला. ‘चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिर बनवली आहेत. तो उत्तम प्रशासक होता, त्याच्या काळात भारताची जीडीपी सर्वात जास्त होती. छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये धर्माची लढाई नव्हती, देशात सध्या औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं रंगवली जात आहे.’, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते.





















