
जळगाव मिरर | २६ एप्रिल २०२५
इलेक्ट्रिक पंखा दुरुस्ती करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या धक्क्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाल्मीक नगरात घडली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. महेश राजेंद्र तायडे (वय २५), रा. वाल्मीक नगर, पक्की चाळ जळगाव असे मयत तरुणाचे नाव आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, वाल्मीक नगर परिसरामध्ये शुक्रवारी २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घरातील लाईट गेली होती. त्यावेळी महेश तायडे आणि घरातील फॅन दुरुस्ती करत होता. काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. शेजारी राहणाऱ्यांनी त्याला तात्काळ खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. यावेळी त्याची आई आणि आजी यांनी एकच आक्रोश केला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेबाबत शनी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.