जळगाव मिरर । १ ऑक्टोबर २०२५
गेल्या काही महिन्यापासून पुणे शहरातील गुन्हेगारी सातत्याने समोर येत असताना आता एक तरुणीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही घटना किरकोळ वादातून झाल्याची माहिती आहे.
देशासह राज्यात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु असून या अंतर्गत सर्वत्र देवीचा जागर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात एका तरुणीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात एक तरुण एका तरुणीला बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. प्रथम हा तरुण त्या तरुणीच्या कानशिलात मारतो. त्यानंतर तिच्या कंबरेत लाथ घालतो. नंतर सदर तरुणी शांतपणे रस्त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या ऑटोत जाऊन बसते.
त्यानंतर त्या ऑटोतून बाहेर पडते आणि रस्ता ओलांडते. त्यानंतर ती मध्येच तरत येते. त्यानंतर पुन्हा हा तरूण तिच्या पोटात लाथ घालतो. एका किरकोळ वादातून ही घटना घडल्याचा सांगण्यात येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुणे – सातारा रस्त्यावरील केके मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. पण पीडित तरुणी कोण? व तिला मारहाण करणारा तरुण कोण? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विशेषतः या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांतही कोणती तक्रार दाखल झाली नाही. सहकार नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली. पण या घटनेवर सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.