
जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२५
नंदुरबार शहरातील धुळे चौफुली ते नवापूर चौफुली दरम्यान भरधाव वेगातील एसटी बसच्या धडकेत ३४ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एसटी बसचालकाविरोधात गुन्हा दाखल आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत संतोषराव सुर्वे (३४) रा. कोकणीहिल, नंदुरबार असे मयताचे नाव आहे. तो जळगाव शहरातील निवृत्तीनगर येथील रहिवासी होता. प्रशांत सुर्वे हा युवक शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास एमएच १९ सीडी ४४४० या दुचाकीने धुळे चौफुलीकडून कोकणीहिलकडे जात असताना लाल पेट्रोलपपांजवळ समोरुन भरधाव वेगात आलेल्या एमएच २० बीएल ३४५९ या एसटी बसने धडक दिली.
धडकेत प्रशांत सुर्वे याला गंभीर मार लागल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दिपक धुडा चित्ते यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन बसचालक रविंद्र हिंमतराव पाटील (४५) रा. शिंगावे ता. शिरपूर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रशांत सुर्वे हे नंदुरबार येथील पोलीस सोसायटीमध्ये चर्तुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत होते.