जळगाव मिरर । ११ ऑक्टोबर २०२५
जळगाव – शिरसोली रोडवरील एका ठिकाणी लव जिहादच्या संशयावरून शनिवारी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास एका तरुणाला जबर मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यात तरुणाला जबर मारहाण केल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात १० जणांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील तरुण आणि तरुणी हे दोघे शनिवारी दुपारी जळगाव शहरातील मोहाडीरोड परिसरात एका दुकानावर थांबले असताना यावेळी काही तरुणांनी दोघांची विचारपूस केली. त्यावर दुचाकीवरील तरुणाने अर्वाच्च भाषेचा वापर केला. दरम्यान हा लव जिहादचा संशय आल्याने संतप्त उपस्थित तरुणांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर येथील तरुणांनी या तरुणाची दुचाकी पेटवून दिली, त्यामुळे दुचाकी जळून खाक झाली आहे. जखमी झालेल्या तरुणावर प्राथमिक उपचार देण्यात आले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी या प्रकारात १० तरुणांना ताब्यात घेतले आहे.