जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२५
जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेल्या श्वान ‘जंजीर’च्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात पार पडला. या विशेष कार्यक्रमाला मा. पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, श्वान पथक प्रभारी अधिकारी पो.उपनिरीक्षक देविदास वाघ तसेच श्वान हस्तक पोहेकॉ निलेश झोपे, पोना प्रशांत कंकरे आणि पोहेकॉ संदीप परदेशी उपस्थित होते.
श्वान ‘जंजीर’चा जन्म 18 नोव्हेंबर 2017 रोजी झाला असून, त्याने गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 7 एप्रिल 2018 रोजी तो जळगाव जिल्हा पोलिस दलात दाखल झाला. गेल्या सात वर्षांच्या सेवाकाळात जंजीरने चाळीसगाव, भुसावळ शहर, एमआयडीसी आणि इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
गुन्ह्यांच्या तपासात आणि आरोपींचा मागोवा घेण्यात त्याच्या तीक्ष्ण वास घेण्याच्या क्षमतेमुळे पोलिस दलाला अनेक वेळा यश मिळाले. आज सन्मानपूर्वक निरोप देताना अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून जंजीरच्या सेवेला आदरांजली अर्पण करण्यात आली.



















