नागपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नागपुरात परतल्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून हटविल्यानंतर त्यांचा हा पहिलाच नागपूर दौरा होता. पण या दौऱ्यातही फडणवीस समर्थकांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरचा राग गेला नव्हता. फडणवीस ज्या गाडीतून लोकांचं अभिवादन स्वीकारत होते, त्या गाडीवर पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फोटो होते. मात्र या बॅनरवर गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो नव्हता.
राज्याचे नूतन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कथित ‘गेम’वरून पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसला. केंद्रीय नेतृत्वाविरुद्ध रोष असून याबाबत कुणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही. फडणवीस यांचे कर्तृत्व अधोरेखित करणाऱ्या होर्डिंग्जवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे छायाचित्र गायब असल्याची चर्चा काल दिवसभर नागपुरात होती. स्थानिक भाजप नेत्यांनी अमित शाहांचा फोटो बॅनर्सवरुन वगळण्याचा प्रयत्न केला पण त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आणि विधानसभेत बहुमताचा ठराव पास केल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात गेले होते. यावेळी विमानतळावर त्यांना रिसिव्ह करण्यासाठी त्यांच्या शेकडो समर्थकांनी गर्दी केली होती. विमानतळापासून त्यांची मिरवणूक सुरु झाली. ढोल ताशांचा दणदणाट, फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करत समर्थकांनी फडणवीसांचं जंगी स्वागत केलं. जवळपास पावणे दोन तास फडणवीसांची रॅली सुरु होती.
मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांची घोषणा करून स्वत: कुठलेही पद स्वीकारणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. यानंतर तासाभरात दिल्लीहून आलेले फोन व ट्विटवरून त्यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची सूचना करण्यात आली. कुठलेही पद स्वीकारणार नाही, असे जाहीर केल्यानंतरही त्यांचा गेम झाला का?, पदावनत का करण्यात आले?, असे प्रश्न मागील चार दिवसांपासून तासांपासून चर्चेत आहेत.विदर्भ व मराठवाडा या मागास भागाच्या विकासाशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास शक्य नसल्यामुळे मागास भागाच्या सर्वंकष विकासाचा अजेंडा राबविणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘प्रेस क्लब ऑफ नागपूर’ तर्फे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माध्यम संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.