मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गुरुपौर्णिमेनिमित्त शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच मी मुख्यमंत्री झालो आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम मी आणि माझ्यासोबतचे 50 आमदार करणार आहेत.
एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच मला राजकीय जीवनात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळाली. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादामुळेच मी आज मुख्यमंत्रीपदावर आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे घेऊन जाण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. राज्यातील सत्ता बदलानंतर बाळासाहेब ठाकरे आमच्या पाठिशी आहेत. त्यांना अपेक्षित असा राज्याचा विकास करु.
शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना वंदन करण्यासाठी आपण ठाण्यात जाणार असल्याचेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, दरवर्षी हजारो शिवसैनिक ठाण्यातील टेंभी नाक्यावर आंनद दिघे यांना वंदन करतात. मी पण तिकडे जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या प्रेरणेने आमचे सरकार सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. या दोन्ही दिवंगत नेत्यांना अपेक्षित असा राज्याचा सर्वांगिण विकास सरकार करेल. वारकरी, शेतकरी, गोरगरीब सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल.
मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक भागांत आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यातील स्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क केला जात आहे. पावसामुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. राज्यात एनडीआरएफचे पथके तैनात करण्यात आली आहेत. दुर्घटनाग्रस्त भागात नागरिकांना जेवणासह पाणी, निवासाची सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.




















